सर्व सभासद बंधू व भगिनींनो सर्व प्रथम अहवाल वर्षात सर्व सभासदांनी संचालक मंडळावरील आपला विश्वास कायम ठेवून संचालक मंडळास सर्वतोपरी सहकार्य दिल्या बद्दल संचालक मंडळाच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो व पुढील कालावधीत आमच्या वरील आपला विश्वास कायम राहील या दृष्टीनेच कार्य करू याची मी ग्वाही देतो  .

पतसंस्थेच्या वतीने  बाविसाव्या वार्षिक सभेत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सर्व सामान्य माणसाचे आर्थिक जीवन सहकार्याच्या माध्यमातून उज्वल व्हावे या उद्देशाने एकत्र येवून स्थापन केलेल्या आपल्या संस्थेला २२ वर्ष पूर्ण झाले.  ही अभिमानाची बाब असून हे शक्य झाले ते   केवळ आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासामुळे. वर्धमानने आज मराठवाड्यातील  अग्रगण्य पतसंस्था म्हणून नाव लौकिक मिळवलेले आहे . ग्राहक सेवा हेच ध्येय अंगीकृत बाळगून संस्था ३६१ दिवस कार्यरत आहे .  त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही ग्राहकांना व्यवहार करता येतात . आपल्या संस्थेत ठेवी स्वीकारताना व कर्ज देतांनाही प्रत्येक सभासदांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेवूनच योजना तयार करण्यात आल्या आहेत . कर्जाच्या अनेक योजना राबवताना त्यात त्वरित कर्ज , मुदत ठेव कर्ज, सोने तारण कर्ज, वाहन तारण कर्ज , कुटीर उद्योग कर्ज , महिला बचत गट कर्ज देण्यात येते. मला अभिमानाने येथे नमूद करावसे वाटते की दि.१७ व १८ जानेवारी २०१५ ला कलाग्राम येथे बचत गट उत्पादित वस्तूचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून १०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल तेथे लावण्यात आले होते. आज शहरात आपल्या संस्थेच्या सहा शाखा कार्यरत असून  मुख्य कार्यालय मुकुंदवाडी येथे आहे. या सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीने जोडलेल्या असल्यामुळे ग्राहकांना सर्व शाखेतून पैशाचे व्यवहार करणे अत्यंत सोपे झालेले आहे. आपल्या प्रत्येक शाखेत तरुण व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग सकाळी १० ते सायंकाळी  ६ पर्यंत सेवा देत असतात . आर्थिक व्यवहारा सोबतच संस्थेचा सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग असतो. संस्थे तर्फे रक्तदान शिबीर,  नेत्र तपासणी शिबीर , देहदान जागृती, स्वच्छता अभियान, पाडवा पहाट इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात . तसेच वीज बिल स्वीकारणे, पॅन कार्ड काढून देणे या सेवा देण्यात येतात सभासदांच्या सुख दु:खात संस्थेचा  नेहमीच सहभाग नोंदवते सभासदांसाठी हेल्थ केअर ही योजना राबवण्यात येते त्याचा ही सभासदांनी लाभ घ्यावा. संस्थेच्या या यशस्वीते मागे संस्थेचे संचालक मंडळ व सल्लागार मंडळ , संस्थे बद्दल निष्ठा व आपुलकी जपणारे आपले कर्तव्य तत्पर कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी , संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे लेखा परीक्षक, कायदे सल्लागार, हितचिंतक यांच्या समर्थ व सार्थ सहकार्यामुळेच आज आपली संस्था यशस्वीपणे  उभी आहे या यशस्वी वाटचालीतील आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद ! आपले सहकार्य असेच मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद !